- मुंबई
सप्टेंबरमध्ये येणार्या गणेशोत्सव काळात गतवर्षी शाळांनी परीक्षा घेतल्याने अनेक विद्यार्थी व पालकांची कोंडी झाली होती. त्यामुळे यंदा गणेशोत्सव काळात शाळांनी परीक्षा घेऊ नये यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संचालकांना सर्व शाळांना सूचना देण्यासंदर्भात विनंतीवजा पत्र दिले आहे. यासंदर्भात युवासेनेकडून नुकतेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते.
राज्यात ९ ते १९ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे लादलेले निर्बंध बर्याच अंशी शिथिल झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी शाळांना किमान पाच दिवसांची सुट्टी असते. परंतु हा उत्सव १० दिवसांचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती नसते. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने शाळांकडून विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी किंवा प्रात्याक्षिके घेण्यात येतात. गतवर्षी अनेक शाळांकडून गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला होता. ही बाब लक्षात घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर व शशिकांत झोरे यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड तसेच शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना गणेशोत्सवकाळात परीक्षा न घेण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी तातडीने शिक्षण संचालकांना पत्र लिहून याबाबत शाळांना योग्य ते आदेश देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. शिक्षण उपसंचालकांनी केलेल्या कार्यवाहीमुळे विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.