मुंबई :
मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थीही फाडफाड इंग्रजी बोलू शकतात, हे दाखवून देणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या बोली इंग्रजी महोत्सवाचे आयोजन मुंबईतील सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी एस हायस्कूलने केले आहे. या महोत्सवात मराठी माध्यमाच्या या शाळेचे विद्यार्थी इंग्रजी भाषेत एकपात्री प्रयोग (mono act), भाषण (speech), कथाकथन (story telling) करणार आहेत.
सायन, धारावी, कुर्ला परिसरातील कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी डी एस हायस्कूल विविध उपक्रम राबवत असते. “विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेविषयी चा न्यूनगंड दूर व्हावा व अस्खलित इंग्रजीत त्यांना आत्मविश्वासाने संवाद साधता यावा यासाठी गेली पाच वर्ष आम्ही शाळेत नियमितपणे स्पोकन इंग्रजीचे प्रशिक्षण वर्ग घेत आहोत. हे प्रशिक्षण केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही दिले जाते. पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक तास इंग्रजी बोलण्याचे शास्त्रीय धडे दिले जातात”, अशी माहिती डी एस हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.
२१ ते २३ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये होणाऱ्या या इंग्लिश लिटररी फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी २२० विद्यार्थ्यांमधून निवडण्यात आलेले इयत्ता पाचवी ते आठवीचे ८० विद्यार्थी इंग्रजी भाषेत एकपात्री प्रयोग, भाषण, कथाकथन करणार आहेत. शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षकच या कार्यक्रमाचे इंग्रजी भाषेत सूत्रसंचालन करणार आहेत. दुसऱ्या दिवशी टॉक विथ लिटररी फ्रेंड कार्यक्रमात उच्चविद्याविभुषित प्राध्यापक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तर तिसऱ्या दिवशी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे, अशी माहिती शाळेत स्पोकन इंग्रजीचे धडे देणारे शिक्षक राकेश दमानिया आणि अमिता आचरेकर यांनी दिली.
इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी इंग्रजीत बोलणार आहेत. शाळेतले इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी सर्वांसोबत इंग्लिश लिटररी गेम्स खेळणार असून हसत खेळत इंग्रजीचा बागुलबुवा पळवून लावणार आहेत.
– राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी एस हायस्कूल