मुरबाड :
तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या व पेसा क्षेत्रात येणाऱ्या वैशाखरे या गावातील केंद्रशाळा असणाऱ्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने खुद्द शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसभेने ठराव मंजूर करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी यासाठी साकडे घातले आहे.यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील वैशाखरे गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेला केंद्र शाळेचा दर्जा आहे.या शाळेत १ली ते ८ वी पर्यंत वर्ग आहेत. तसेच येथे प्राथमिक व माध्यमिक असे १४३ विद्यार्थी विद्यार्थिनींची पट संख्या आहे. मात्र शाळेत शिक्षक फक्त तीनच असल्याने विद्यार्थ्यांची पाटी कोरी राहिली आहे. विशेष म्हणजे या परिसरातील आदिवासी वाड्या पाड्यांवरील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेला तीन पदवीधर शिक्षक तर तीन सहाय्यक शिक्षकांच्या नेमणुका मंजूर करण्यात आल्या असूनही सध्या तीनच सहाय्यक शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कार्यभाग सांभाळीत आहेत. केंद्र शाळेचा दर्जा असलेल्या या शाळेच्या मुख्याध्यापकांची खुर्ची सुध्दा रिकामीच असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशी विदारक परिस्थिती असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. मात्र सर्वसामान्य पालकांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी महागडी फी भरणे परवडणारे नसल्याने ते पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणे पसंत करतात. शिक्षक संख्या कमी असल्याची समस्या या शाळेपूर्ती मर्यादित नसून तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र शाळेचा दर्जा असलेल्या शाळेला शिक्षक उपलब्ध होत नसल्याने शाळा समितीचे अध्यक्ष अंकुश भोईर, सामाजिक कार्यकर्ते नितीन घरत, सुजीत घरत, गणेश साबळे, संतोष घरत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ शिक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. गावातील शिक्षणाची अशी दुर्दशा असेल तर तालुक्यातील शाळांची तुलना न केलेली बरी अशी संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे.