स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित डॉ श्रीधर देशपांडे स्मृती लेदर बॉल टी- २० स्पर्धेत रायझिंग स्टार क्रिकेट क्लबच्या विजयात दिव्यांग गौरव आंबवणेने छाप पाडली. गौरवच्या अष्टपैलू खेळामुळे रायझिंग स्टार क्रिकेट क्लबने युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा चार विकेट्सनी पराभव करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एका हाताने अधू असलेल्या गौरवने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत युनायटेड स्पोर्ट्स क्लबला ९ बाद १३५ धावसंख्येवर रोखण्यात मोलाचे योगदान दिले. गौरवने चार षटकात १९ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स मिळवल्या. युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार आदित्य कोळीने पाच चौकार आणि एक षटकार ठोकत २५ चेंडूत ३७ धावा केल्या. पराग गावडेने ९ चेंडूत नाबाद २४ धावा करताना चार चौकार आणि एक षटकार मारला. सागर डोगावकर आणि तुषार कारुटीआने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल रायझिंग स्टार क्रिकेट क्लबने १८.२ षटकात ६ बाद १३९ धावसंख्येवर विजय निश्चित केला. अथर्व घोसाळकरने ५३ चेंडूत १२ चौकारासह ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली. गौरवने १० चेंडूत दोन खणखणीत चौकार मारत नाबाद ११ धावांची खेळी करत फलंदाजीत आपली उपयुक्तता सिद्ध केली. अशोक बोरवडकरने नाबाद २१ धावा केल्या. शशांक बर्वेने दोन आणि पराग गावडेने एक विकेट मिळवली.