विक्रोळी :
दोन वर्षांच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर आज अखेर दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. कोरोनाच्या महामारीमुळे सलग दोन वर्षं सण-उत्सव साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, कोरोनावर यशस्वीपणे मात करत आज संपूर्ण देशात दिवाळी साजरी करण्यात आली. मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे देखील मंगेश सांगळे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रारंभ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिनेकलाकारांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ हा दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला.
विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे सलग चार वर्षं माजी आमदार मंगेश सांगळे हे ‘मंगेश सांगळे सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘प्रारंभ’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. मात्र, गेले दोन वर्षं कोरोनाच्या महामारीमुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. परंतु, यंदा मोठ्या उत्साहात हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते अॅड. आशिष शेलार, विक्रोळीचे खासदार मनोज कोटक यांच्या उपस्थितीत प्रारंभ चा शुभारंभ करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात मिस विक्रोळी-मिस्टर विक्रोळी या स्पर्धेसह अन्य विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे साजरा होणारा प्रारंभ हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम तरुणाईच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आज सपंन्न झालेल्या या कार्यक्रमात तरुणाईने मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या महामंत्री केतकी अरविंद सांगळे यांनी महिला सक्षमीकरणाच्या प्रचारार्थ महिलांची भव्य बाईक रॅली आयोजित केली होती. मराठमोळ्या वेशभूषा करून विभागातील अनेक महिलांनी या बाईक रॅलीत सहभाग नोंदवला होता.
प्रारंभ या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश सांगळे सोशल फाउंडेशनचे माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच यावेळी भाजपचे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, ईशान्य जिल्हाध्यक्ष अशोक राय, कामगार नेते सुहास माटे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष योजना ठोकळे, आरपीआय नेते अशोक घोक्षे, राजेंद्र कर्डक, प्रथमेश राणे, विनायक जज्जो, ओकांर वायंगणकर, रजनी कदम यांच्यासह हास्यजत्रा फेम अभिनेता ऋत्विक प्रताप उपस्थित होते.