मुंबई :
आपल्या विविध मागण्यांसाठी ५१ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले. मागण्यांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी हे आंदोलन स्थगित केले आहे.
महाराष्ट्र राज्य वैद्यकिय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यामध्ये १५ मार्चला झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या मागण्यांबाबत विस्तृत चर्चा झाली. अस्थायी प्राध्यापकांना कायम करण्याच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच अन्य मागण्या पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे हित आणि रुग्णसेवा लक्षात घेऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन डॉक्टरांना केले. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाराष्ट्र राज्य वैद्यकिय शिक्षक संघटनेने आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेकडून मंत्र्याना सांगण्यात आले आहे. त्यानुसार १९ मार्चला दुपारनंतर कामावर रुजू होण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यकिय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. उदय मोहिते यांनी दिली.
वैद्यकिय शिक्षक संघटनेच्या इतिहासात असे अभूतपूर्व आंदोलन झाले नव्हते. या आंदोलनामुळे वैद्यकिय शिक्षकांच्या एकीबद्दलचे व संघटनेच्या ताकदीचे सर्व गैरसमज शासनाच्या अनेक स्तरावर दूर करण्यात संघटनेला यश आले. हे यश एका दिवसात मिळाले नसून सततचा पाठपुरावा, मुद्दे पटवून देण्याची क्षमता, परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय तसेच सर्व शिक्षकांचा पाठिंबा यामुळे साध्य झाले आहे. या सर्व प्रक्रियेत आघाडीवर असणारे संघटनेचे सचिव डॉ. समीर गोलावार तसेच डॉ. सचिन मुळकुटकर आणि संघटनेच्या सर्व स्थानिक शाखांचे अध्यक्ष, सचिव व प्रत्येक सदस्य ज्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्यांचे मोहिते यांनी आभार मानले. विधानसभेत व विधानपरिषदेत प्रश्न मांडणाऱ्या आमदारांचेही त्यांनी आभार मानले.