मुंबई :
नवजात बाळाचे वजन कमी असेल तर त्याच्या जीवाला धोका असण्याची शक्यता असते. त्यातच ते बाळ जर वेळेपूर्वी जन्माला आले असेल तर हा धोका अधिक वाढतो. कामा रुग्णालयामध्ये २७ जानेवारी प्रसूतीपूर्व म्हणजे ३१.२ आठवड्याच्या जन्माला आलेल्या बाळाचे वजन अवघे ६५२ ग्रॅम इतके भरले. वेळेपूर्वी त्यातच वजनही कमी भरल्याने या बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र तब्बल ९९ दिवस बाळाची काळजी घेत त्याला जीवदान देण्यात कामा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
भिवंडी येथे राहणार्या समरीनबानो रहमतिउल्ला अन्सारी (३०) या महिलेच्या पोटात २६ जानेवारीला अचानक दुखू लागले. त्यामुळे तिला तातडीने कामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गर्भाशयातील पाणी कमी झाले होते आणि तिच्या पोटामध्ये अवघ्या ३१.२ आठवड्यांचा गर्भ होता. त्यातच तपासणीमध्ये मातेला हेर्पेस सिप्लेक्स विषाणूचा संसर्ग झाल्याचे लक्षात आले. मातेला झालेला संसर्ग आणि गर्भाशयातील कमी झालेले पाणी यामुळे डॉक्टरांनी २७ जानेवारीला तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर जन्माला आलेल्या बाळाचे वजन अवघे ६५२ ग्रॅम इतकेच भरले. प्रसूतीपूर्व आणि वजन कमी असल्याने बाळाच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याला तातडीने नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉ. श्रुती ढाले यांच्या देखरेखीखाली कामा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिकांनी बाळाची काळजी घेण्यास सुरुवात केली.
बाळाच्या शरीरात रक्त कमी असल्याने त्याला ९९ दिवसांत तब्बल १० वेळा रक्त चढवण्यात आले. तसेच त्याच्या डोळ्यांची व हृदयाची तपासणी, मेंदूची तपासणी, पोटाची तपासणी, पाठीतील पाण्याची तपासणी अशा सर्व तपासण्या करण्यात आल्या. मातेला दूध कमी असल्याने बाळाला त्रास होऊ नये यासाठी त्याला रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँकमधून दूध पुरविण्यात आले. हे दूधही बाळाला तोंडावाटे नळीद्वारे दिले जात होते. बाळ कमी वजनाचे असल्याने त्याला संसर्ग होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे परिचारिकांकडून बाळासाठी वापरण्यात येणार्या वस्तू व खोलीचे वेळोवेळी व्यवस्थित निर्जंतुकीरण करण्यात येत होते. बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून अँटिबायोटिक इंजेक्शनही देण्यात आले. बाळाचे वजन वाढविण्यासाठी कांगारू मदर केयर सुविधाही पुरवण्यात आली. परिचारिकांकडून मातेला समुपदेशन करून प्रोत्साहित करण्यात येत होते. डॉक्टर आणि परिचारिकांच्या मेहनतीमुळे बाळाचे वजन मे महिन्यामध्ये १९१४ ग्रॅम इतके भरले. त्यामुळे त्याचे लसीकरण करून ५ मे रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. बाळाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांचे मातेने व नातेवाईकांनी मनापासून आभार मानले.
कामा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तुषार पालवे, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रुती ढाले, अधिसेविका निरुपमा डोंगरे, नवजात शिशू अतिदक्षता विभाग परिसेविका ज्योती डाके यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले होते. तसेच एनआयसीयूमधील निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.