मुंबई :
आपल्या मागण्यांसाठी सलग ४५ दिवस आंदोलन करूनही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. राज्यातील १९ महाविद्यालयांमधील वैद्यकीय शिक्षकांनी ७ मार्चला थाळीनाद केल्यानंतर आता ८ मार्चला सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना घेराव घालत त्यांना पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन दिले.
अस्थायी डॉक्टरांचे समावेशन, ७ व्या वेतन आयोगातील भत्ते, आश्वासित प्रगती योजना अशा अनेक मागण्यांसाठी राज्यातील १९ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक आंदोलन करत आहेत. राज्यात १९ वैद्यकीय महाविद्यालये असून, ४ ते ५ नवीन महाविद्यालये सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अवघ्या ४ ते ५ महाविद्यालयांमध्येच कायमस्वरूपी अधिष्ठाता कार्यरत आहेत. उर्वरित सर्व महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून प्रभारी अधिष्ठातांच्या माध्यमातून कारभार चालवला जात आहे. त्याचप्रमाणे सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांतील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना कायम करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एकीकडे नवीन महावियालये सुरु करायची आणि दुसरीकडे प्रभारी अधिष्ठाता, प्रतिनियुक्ती शिक्षक यांच्या जोरावर काम करायचे आणि अनेक वर्षांपासून अस्थायी म्हणून काम करणार्या डॉक्टरांना कायम करण्याकडे दुर्लक्ष करणे ही शासनाची भूमिका विरोधाभासाची असल्याचे मत महाराष्ट्र राज्य वैद्यकिय शिक्षक संघटनेच्या केंद्रीय शाखेच्या वतीने अधक्ष्य डॉ. उदय मोहिते, सचिव डॉ. समिर गोलावार, डॉ. उमेश कानडे, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. सचिन मुळकुटकर यांनी सांगितले. आमच्या या आंदोलनामुळे अधिष्ठात्यांना होणार्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. ते आमचे म्हणणे शासन दरबारी ठामपणे मांडतील, अशी आशा मध्यवर्ती शिक्षक संघटना सचिव डॉ. समीर गोलावार यांनी व्यक्त केली.
रुग्णसेवा खंडित करण्याची आमची इच्छा नाही
आम्ही शासनाला आमच्या आंदोलनाचा कार्यक्रम अधिष्ठातांमार्फत कळवत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील रुग्णसेवा खंडित करण्यात येईल. मात्र रुग्णसेवा खंडित करण्याची आमची इच्छा नसल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले. त्यासाठी शासनाने संघटनेशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा अशी बाजू संघटनेच्या वतीने डॉ. शरद मालवडकर, डॉ. संजय मोरे, डॉ. अमित दिस्वल ,डॉ. शिराझ बेग, डॉ. येल्लाप्पा जाधव, डॉ. दिनेश धोडी, डॉ. योगेश गालफाडे यांनी मांडली आहे.