मुंबई :
अस्थायी स्वरुपातील सहाय्यक प्राध्यापकांना कायम करणे, वेतन आयोग लागू करणे यासारख्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ५० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांनी १४ मार्चपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील शस्त्रक्रियेवर परिणाम झाला असून, सुमारे १२०० नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारचे दुर्लक्ष कायम राहिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्याचा परिणाम बाह्यरुग्ण सेवेवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
करिअर ऍडव्हान्समेंट योजना सातव्या वेतन आयोगात लागू करा, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शासकीय सेवेत समावेशन करा, सातव्या वेतन आयोगात पदव्यूत्तर पदवी अर्हताधारकाला प्रोत्साहनपर सहा वेतनवाढी लागू करा, करार पद्धतीवरील नियुक्तीबाबत ९ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय रद्द करा, सरळ सेवा भरती प्रक्रियेत शासन सेवेत कार्यरत असणार्या अध्यापकांना प्राधान्य द्या, अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली मागील ५० दिवसांपासून डॉक्टर आंदोलन करत आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांकडून कँडल मार्च काढणे, निदर्शने करणे, थाळीनाद करणे, काळी फिती लावून काम करणे अशा अनेक पर्यायांचा वापर केला. मात्र कोरोना काळामध्ये डॉक्टरांना सहानुभूती दाखवणार्या सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील २७०० डॉक्टरांनी १४ मार्चपासून रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या बंदचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी बाह्यरुग्ण विभागामध्ये वैद्यकीय विद्यार्थी व निवासी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे बाह्यरुग्ण सेवेवर फारसा परिणाम जाणवला नसला तरी राज्यात सुमारे १२०० नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ रुग्णालयांवर आली. नियोजित शस्त्रक्रिया रद्द झाल्या असल्या तरी अत्यावश्यक ३०० ते ३५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवा विद्यार्थ्यांच्या हाती सोपवणे म्हणचे रुग्णांचे आरोग्य धोक्यात घालण्याची प्रकार असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.
डॉक्टरांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सांभाळली. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही. मात्र नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असल्यातरी अत्यावश्यक शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
– डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय