मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या (आयडॉल) परीक्षेला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र अद्यापह अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत. परीक्षा तोंडावर आली असतानाही आयडॉलला वारंवार खेटे मारूनही पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे ‘कोणी पुस्तके देता का, पुस्तके?’ असा टाहो आयडॉलच्या विद्यार्थ्यांकडून फोडला जात आहे. पुस्तकेच मिळाली नसल्याने परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.
नोकरी करून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी आयडॉल हे महत्त्वाची भूमिका बजावते. आयडॉलला दरवर्षी साधारण ६० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रवेश घेत असतात. विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करायचा असल्याने प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना आयडॉलकडून पुस्तके पुरवली जातात. सध्या आयडॉलमध्ये सेमिस्टर पद्धती राबवण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना सेमिस्टरनुसार पुस्तके देण्यात येत आहेत. सध्या सेमिस्टरनिहाय परीक्षा आयडॉलकडून घेण्यात येत आहे. मात्र
आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा २९ मार्चपासून सुरू होत आहेत. एम.ए. (इतिहास) या अभ्यासक्रमाच्या प्रथम सेमिस्टरची परीक्षा २९ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र या विषयाची पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतल्यापासून परीक्षा सुरू होईपर्यंत प्रत्येक महिन्याला फेरी मारूनही पुस्तके मिळालेली नाहीत. एम.ए (इतिहास) या विषयाप्रमाणे अन्य विषयांची पुस्तकेही विद्यार्थ्यांना आयडॉलकडून अद्याप दिलेली नाहीत. पुस्तके घेण्यसााठी येणार्या विद्यार्थ्याला पुस्तके अद्याप आली नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत आहे. नोकरी करणार्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी सुट्टी घेऊन फेर्या माराव्या लागत आहेत. परीक्षा तोंडावर आली असूनही पुस्तके आयडॉलकडून देण्यात येत नसल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. विद्यार्थी पुस्तकांसाठी वारंवार फेर्या मारत असल्याने अखेर पुस्तकांच्या झेरॉक्स काढून देण्याची नामुष्की आयडॉलावर आली आहे. मात्र झेरॉक्स सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने अखेर काही विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्याकडे धाव घेतली. थोरात यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके मिळावीत, अशी विनंती केली आहे.
आयडॉलने २४ मार्च रोजी आपला ५२ वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाने आयडॉलची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत केल्यास एकलव्याप्रमाणे अनेक विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन केले होते. मात्र आयडॉलमधील भावी एकलव्यांना आपल्या शस्त्रांसाठीच खेटे मारायला लावून मुंबई विद्यापीठ त्यांंच्या भविष्याशी खेळत असल्याची टीका युवासेनेचे सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी केला.