मुंबई
डोंबिवलीमध्ये शनिवारी कोरोनाचा नवा व्हेरिंएट असलेल्या ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दुसर्याच दिवशी रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा आणि पुण्यामध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सातवर तर देशातील रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने सरकारच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी ४४ वर्षीय महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसोबत पिंपरी चिंचवड येथे २४ नोव्हेंबरला आली होती. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी करण्यात आली असता त्यातील महिलेचा भाऊ आणि त्याची दीड वर्षे आणि ७ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. या सहाही जणांचे नमूने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणू संस्थेने रविवारी दिलेल्या अहवालामध्ये सहाही जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. या सहा जणांपैकी तिघे १८ वर्षांखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. मात्र तिघांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यातील दोघांची कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यातही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. पुण्यातील ४७ वर्षीय पुरुषालाही या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. पुण्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला आहे. हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबरदरम्यान फिनलँड येथे गेला होता. २९ तारखेला त्याला थोडासा ताप आला म्हणून त्याचे चाचणी केली असता तो कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले. त्याचे नमूने नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवालही रविवारी आला असून, त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे सिद्ध झाले आहे.
राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या आंतराराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळपर्यंत २८ हजार २२१ प्रवासी आले. यामध्ये अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ४९०१ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या २३,३२० प्रवाशांपैकी ५४३ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.