Voice of Eastern

डोंबिवली :

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रहिवासी भागांपासून ५० मीटरवर असलेले रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण राज्य सरकारने घेतला आहे. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात, प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने १५६ कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये ५२५ औद्योगिक, तर ६१७ निवासी भूखंड आहेत. यामध्ये १५६ कारखाने हे रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे आहेत. त्यामुळे या धोकादायक कारखान्यांना उत्पादनात बदल करून व्यापारी, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी संबंधी उत्पादने तयार करण्याची परवानी दिली जाणार आहे. या कारखान्यांना पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रचलित दराने भूखंड उपलब्ध करण्यात येणार आहे. हे कारखाने स्थलांतरित करताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय संबंधित विभागाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापेमधील जेम्स ज्वेलरी पार्क वेगाने पूर्णत्वाकडे

नवी मुंबईतील महापेमधील जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ८६ हजार ५३ चौरस मीटर भूखंड वितरित केला आहे. भूखंड विकासाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवून देण्यात येणार आहे. जेम्स व ज्वेलरी एक्सोर्ट प्रमोशन काऊन्सिलतर्फे विकसित होणार्‍या या उद्योग पार्कमध्ये १,३५४ दागिने उत्पादक कारखाने सुरू होतील. कारखान्यांमध्ये १ लाख जणांना रोजगार उपलब्ध होईल. या पार्कमध्ये सुमारे १४ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी प्राधान्याने भूखंड

दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून प्राधान्यांने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्य शासनाने घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अमंलबजावणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

Related posts

मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ

शिक्षकांसाठी १ जूनपासून वेतन श्रेणी प्रशिक्षण

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष – मुख्यमंत्री

Leave a Comment