मुंबई :
कोरोना आणि त्याचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रोनच्या रुग्णांमध्ये काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यातच सध्या सातत्याने होत असलेल्या बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील २८ दिवसांमध्ये कावीळ, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो चिकनगुनिया या आजारांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो लेप्टो चिकनगुनिया कावीळ या साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. पावसाळा असेपर्यंत साथीचे आजार पसरत असतात. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १ ते २८ डिसेंबरपर्यंत गॅस्ट्रोचे ३४९ रुग्ण, मलेरिया २३५ रुग्ण, डेंग्यू ३७, कावीळ ३०, चिकनगुनिया १० आणि लेप्टो ४ रुग्ण आढळल्याने मुंबईमध्ये पुन्हा साथीच्या आजारांचा धोका वाढत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान, साथीचे आजार बळावत असतानाच वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूमुळे ३ जण दगावल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.