मुंबई :
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२१ ऑनलाईन घेण्यावरून झालेल्या गदारोळानंतर ९ व १० एप्रिला परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र त्याचदिवशी लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. परिणामी रेखाकला परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अडचण निर्माण होऊ नये यासाठी कला संचालनालय व शाळा मुख्याध्यापकांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.
कोरोनाचे कारण देत कला संचालनालयाने इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्याला विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. ही परीक्षा ऑनलाईन देणे शक्य नसल्याचे कला शिक्षकांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ही परीक्षा ९ व १० एप्रिलला ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे सामंत यांनी जाहीर केले. परीक्षेसाठी केंद्र, समन्वयक, परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक व विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू असताना आता त्याच दिवशी लोकसेवा आयोगाचीही परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रेखाकला परीक्षेसाठी केंद्र म्हणून नोंदणी केलेल्या शाळांमध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षेचे केंद्र आले आहे. त्यामुळे एकाच दिवशी एकाच केंद्रांवर दोन परीक्षा कशा घेण्यात येतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कला संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार ज्या केंद्रांवर शासकीय रेखाकला परीक्षेसह लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचेही केंद्र असेल, अशा शाळेने पर्यायी व्यवस्था म्हणून नजीकच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून परीक्षा केंद्राचे ठिकाण निश्चित करण्याचे तसेच त्या केंद्राचे नाव व पत्ता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी कळवण्यात यावे, असे निर्देश कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी संबंधित शाळांना दिले आहेत.
नोंदणी करण्यास ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
शासकीय रेखाकला परीक्षेची नोंदणी आणि परीक्षा शुल्क पेमेंट गेट वेद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र नोंदणी केलेल्या केंद्रांवर परीक्षा देणार्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही आणि ऑनलाईन पद्धतीन शुल्कही अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थी नोंदणी व शुल्क भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र केंद्राच्या लॉगइन आयडीवर ४ एप्रिलला तर निकालपत्राच्या नमुन्याची प्रत लॉगइनवर ६ एप्रिलला उपलब्ध होईल, अशी माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.