मुंबई :
पुस्तके हे ज्ञानाचा स्त्रोत असून, त्यांना गुरूचा दर्जा दिला असताना मुंबई विद्यापीठाच्या अनागोदी कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. ग्रंथालयाची दुरवस्था झाली असून, ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे, प्रबंध हे पोत्यामध्ये कोंबून सिमेंट, वाळूच्या ढिगार्यात ठेवण्यात आली आहेत, अनेक पुस्तके हे वाळवीचे खाद्य बनले आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे विद्यापीठाकडून दुर्लक्ष केले जात असताना आता स्वत:चे अस्तित्त्व टिकवण्यासाठी पुस्तकांवरही आंदोलन करण्याची वेळ आपल्यामुळे आली असल्याचा आरोप करणारे खरमरीत पत्र सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना लिहिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामध्ये लाखो पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ आहेत. ही पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि प्रबंधाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहेत. विद्यापीठातील या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांच्याकडून करण्यात येतो. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदेची खाण असलेल्या या ग्रंथालयाची मागील अनेक वर्षांपासून दूरवस्था होत असल्याची बाब मे २०१९ मध्ये सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सहा महिन्यांने नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु विद्यापीठाच्या संथ कारभारामुळे तीन वर्षे उलटली तरी दुरुस्तीचे काम रखडले आहे. दुरुस्तीसाठी ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे योग्य पद्धतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आवश्यक असताना विद्यापीठाने ही ग्रंथसंपदा पोत्यामध्ये कोंबून सिमेंट व वाळूचे ढिगारे ठेवलेल्या भागामध्ये ठेवली आहेत. अनेक पुस्तके व्हरांड्यामध्ये धूळ खात पडली असून, पुस्तकांना वाळवी लागलेली आहे. संशोधन करण्यासाठी वर्तमानपत्रे हे प्राथमिक स्रोत आहेत. विद्यापीठाकडे ५० वर्षांहून जुनी असलेली वर्तमानपत्रे वाईट अवस्थेत ठेवली आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रबंध हे सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने ठेवल्याने त्यांना वाळवी लागली आहे. पोत्यामध्ये कचरा भरावा याप्रमाणे ही ग्रंथसंपदा भरून ठेवताना विद्यापीठाने कसलेही भान राखलेले नाही. यातून विद्यापीठ पुस्तकांशी असंवेदनशील कसे वागू शकते असा प्रश्न वैभव थोरात यांनी पत्रामध्ये उपस्थित करताना ‘पुस्तकांना जर शक्य झाले असते तर त्यांनीच विद्यापीठ प्रशासनावर गुन्हा दाखल केला असता, तसेच आता पुस्तकांवरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे’ अशी खरमरीत टीका कुलगुरूंवर केली आहे. तसेच कुलगुरुंनी आपली अलिशान गाडी कधी या इमारतीकडे वळवावी आणि ही दूरवस्था पाहून विद्यार्थी व पुस्तकांना न्याय द्यावा अशी मागणीही थोरात यांनी केली आहे.
पाच वर्षांपासून ग्रंथालयाची नवीन इमारत पुस्तकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीमध्ये ग्रंथालय स्थलांतरीत करण्यास वेळ नाही का? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. तसेच विद्यापीठाच्या संथगतीच्या कारभारामुळे नवीन इमारतीचीही अशीच अवस्था होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कर्मचारीही जीव मुठीत ठेऊन करतात काम
ग्रंथालयाची इमारतीची दुरवस्था झाली असून, तिचा कोणताही भाग कधीही कोसळू शकतो. अशा भयानक अवस्थेत असलेल्या या इमारतीमध्ये कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेतच, पण विद्यार्थीही अभ्यास करत आहेत. दुरुस्तीची ठोकठाक, धुळ, माती, रेती आणि सिमेंटचा त्रास करून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील स्वच्छतागृहांची अवस्थाही वाईट असल्याचे थोरात यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
पाच वर्षांपासून स्कॅनर पडून
काळानुरुप ग्रंथालय डिजिटल करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने ७५ ते ९० लाख रुपये खर्च करुन स्वयंचलित स्कॅनर विकत घेतला होता. मात्र हा स्कॅनर चालवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे नसल्याने पाच वर्षांपासून हा स्कॅनर विनावापर पडून असल्याचेही थोरात यांनी या पत्राद्वारे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले आहे.