नवी दिल्ली :
सध्या अनेक तरुणांवर विविध राजकीय पक्षांच्या विचारसरणीचा पगडा असतो. त्यातून ही तरुणाई अनेकदा सरकारविरोधी आंदोलन करताना रेल्वे रुळांवर निदर्शने, रेल रोको, रेल्वे मालमत्तेचे नुकसान यासारख्या तोडफोड/बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होतात. मात्र यापुढे रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेला तरुण अशा बाबींमध्ये सहभागी असल्यास त्याला रेल्वेतील नोकरीचे दरवाजे कायम बंद होणार आहेत.
रेल्वे रुळांवर निदर्शने, रेल रोको, रेल्वे मालमत्तेचे नुकसान यासारख्या तोडफोड किंवा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेला तरुण रेल्वे किंवा सरकारी नोकरीसाठी अयोग्य ठरतो. अशा प्रकारची कृत्ये ही बेशिस्तीची सर्वोच्च पातळी आहे, त्यामुळे या कृत्यांमध्ये सहभागी असणारा तरुण हा रेल्वेतील नोकरीसाठी पात्र ठरत नाही, असे रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये नमूद केले आहे. तरुणाच्या बेशिस्त वर्तणुकीचे चित्रीकरण विशेष संस्थांच्या मदतीने तपासले जाईल आणि बेकायदेशीर वर्तनात सहभाग आढळलेल्या उमेदवार किंवा इच्छुक यांच्यावर पोलिस कारवाई तसेच रेल्वेची नोकरी मिळविण्यावर आजीवन बंदी घातली जाईल, असेही नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
रेल्वे भरती मंडळे (RRBs) प्रामाणिकपणे निष्पक्ष आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहेत. रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुक किंवा उमेदवारांनी बेशिस्तपणे वागू नये किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू पाहणाऱ्या घटकांच्या प्रभावाला बळी पडू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.