नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेली व्यवसाय सुलभता आणि नियामक व्यवस्था तसेच इथल्या अफाट क्षमतेमुळे भारत जगातील पसंतीचे स्टार्ट-अप ठिकाण म्हणून उदयाला येत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे इंडिया फर्स्ट टेक स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह -२०२२ आणि पुरस्कार शिखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टार्ट-अपमधून भारताला २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्टार्ट-अप उपक्रमाची घोषणा केली होती, त्यानंतर स्टँडअप इंडिया तसेच विविध दूरदर्शी उपक्रमांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या विविध योजना आणि त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार केलेल्या व्यवस्थेमुळे २०२१ मध्ये भारतात १० हजार स्टार्ट-अपची नोंदणी झाली. भारतात आता ५० हजारहून अधिक स्टार्ट-अप आहेत जे देशात २ लाखांहून अधिक रोजगार पुरवत असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
काही वर्षांमध्ये परिस्थितीनुसार भारताने स्वतःला आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आणि विकासक म्हणून सिद्ध केले आहे. भारतातील उद्योगांना भेडसावणार्या डिजिटल, डेटा आणि तंत्रज्ञानातील अडथळ्यांकडे लक्ष वेधून ते म्हणाले, आपला देश तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक संधी खुल्या करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मॉडेल्सना सक्षम करत आहे. डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते याप्रसंगी यशस्वी स्टार्ट-अपना पुरस्कार प्रदान करण्यात आले.