मुंबई :
कलेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा केवळ इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीच्या आधारेच सवलतीचे गुण मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याविषयीचा शासन निर्णय जारी केला आहे.
दहावीला चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण मिळविण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट परीक्षेलाही बसता येत नाही. मात्र गेल्यावर्षी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे एलिमेंटरी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना यंदाच्यावर्षी केवळ इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या श्रेणीच्या आधारे चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण देण्यात येणार आहे. हा निर्णय केवळ यंदाच्या परीक्षेपुरताच लागू असणार आहे.
यंदा दहावीची लेखी परीक्षा झाल्यानंतर एप्रिल महिन्यात इंटरमिजिएट परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. यासंदर्भात सोमवारी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करत ही माहिती स्पष्ट केली आहे.