मुंबई :
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जे.जे. रुग्णालयातील पात्र वारसदारांना नियुक्त्या देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यांचा अभिप्राय दोन-तीन दिवसात मिळाल्यास पुढील आठवड्यात वारसदारांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे आदेश काढण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य अमिन पटेल यांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी सांगितले की, लाड पागे समितीचा संबंध हा सामाजिक न्याय विभागाशी आहे. त्यामुळे डीएमईआरने वारसदारांना नियुक्त्या देण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला आहे. या वारसदारांच्या नियुक्त्यांना विलंब झाला असला तरी वयोमर्यादा ओलांडलेल्या ७ उमेदवारांना विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घेण्यासाठी शासन विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, डीएमईआरने अभिप्रायासाठी पाठविलेल्या प्रस्तावांवर दोन दिवसांत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
शासन निर्णयामध्ये सुधारणा करणार
२०१८ च्या शासन निर्णयामध्ये लाड पागे समितीच्या शिफारशींचा लाभ फक्त नवबौद्धांनाच मिळेल असा उल्लेख होता. त्यामुळे अनेक सफाई कामगारांना या शिफारशींचा लाभ मिळालेला नाही. सर्व सफाई कामगारांना लाभ मिळावा यासाठी शासन निर्णयामध्ये सुधारणा करून सर्वंकष धोरण येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. सफाई कामगाराची जात न पाहता समितीच्या शिफारशींनुसार वारसांना नोकर्या देण्यात येतील असेही सामाजिक न्यायमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.