मुंबई :
महाराष्ट्रात इथेनॉलनिर्मिती फक्त साखरेपुरती मर्यादित न ठेवता तांदूळ, मका यापासून इथेनॉलनिर्मितीला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. सध्या देशात साडेचार हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास राज्यात सुमारे ५० लाख युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
सध्या देशात प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे आपल्याला ग्रीन हायड्रोजन तयार करायचे आहे. पेट्रोल-डिझेलपेक्षा इथेनॉल हे १० पट चांगले इंधन आहे. तसेच तुलनेत स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल आहे. ऑटो रिक्षा, स्कुटर इथेनॉलवर चालणाऱ्या आल्यास त्याचा फायदा होईल. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये ११ टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अतिरिक्त साखरेपासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर भर दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. यासाठी राज्यातील जिल्हावार परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. नागपूर शहरातील बस एलएनजीमध्ये परिवर्तीत केले आहे. पुण्यात तीन इथेनॉल पंप आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाले तर प्रदूषणाची समस्या सुटेल.
इथेनॉलनिर्मितीबरोबरच बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. बांबू हा कोळशाला पर्याय आहे. त्यामुळे भविष्यातील कोळशाची आयात कमी होण्यास मदत होईल, असेही गडकरी म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या ‘नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या विकासवाटा’ परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.