Voice of Eastern

मुंबई :

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२  मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे २०२२ अखेर ६८ हजार ४४३ उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी २०२१ मध्ये राज्यात २ लाख १९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

मंत्री टोपे म्हणाले की, माहे मे २०२२ मध्ये विभागाकडे ३३ हजार ६७७ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. मेमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५५६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ०२७, नाशिक विभागात २ हजार ३२७, पुणे विभागात सर्वाधिक १४ हजार ३१३, औरंगाबाद विभागात ३३३, अमरावती विभागात ३४८ तर नागपूर विभागात २०८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले आहे.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९५ हजार ४५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Related posts

किरीट सोमय्या यांची महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्याविरोधात पोलीस तक्रार

Voice of Eastern

मुंबई विद्यापीठाला पेट परीक्षेचा विसर

नववर्षात महिला लोकल डब्यात लावणार सीसीटीव्ही कॅमेरे

Voice of Eastern

Leave a Comment