मुंबई :
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होत आहे. विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांच्या माध्यमातून जानेवारी २०२२ मध्ये कौशल्य विभागाकडून राज्यातील ७ हजार ७१३ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्यातील नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट संस्था यांची महास्वयंम वेबपोर्टल आणि ऑनलाईन रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून उत्तम सांगड घालून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. त्यानुसार जानेवारी २०२२ मध्ये कौशल्य विकास विभागाकडे २५ हजार ९८१ इतक्या उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये मुंबई विभागात ५ हजार ८८८, पुणे विभागात ६ हजार ५५६, नाशिक विभागात ५ हजार १५२, औरंगाबाद विभागात ४ हजार ७११, नागपूर विभागात २ हजार १३४ तर अमरावती विभागात १ हजार ५४० बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या २५ हजार ९८१ उमेदवारांपैकी ७ हजार ७१३ उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २ हजार ८४७, नाशिक विभागात २ हजार ७९५, औरंगाबाद विभागात १ हजार २८५, पुणे विभागात ५३५, अमरावती विभागात २१३ तर नागपूर विभागात ३८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांतर्गत २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्यात २०२१ मध्ये वाढ करण्यात विभागाला यश आले आहे. २०२१ मध्ये २ लाख १९ हजार उमेदवारांना विभागांतर्गत नोकरी मिळवून देण्यात आली आहे.