Voice of Eastern

मुंबई :

राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) एक रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. हे प्रत्येक रुग्णालय ३० बेडचे असणार आहे. महामंडळाची १० किलोमीटरपर्यंत एक रुग्णालय ही महामंडळाची अट काढून टाकण्यात येणार असून, लोकसंख्या व आवश्यकतेनुसार रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री तथा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कोविड काळात ईएसआयसीच्या रूग्णालयाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करून राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना प्राधान्याने सर्व सोयीसुविधा पुरवण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. दाव्याची प्रतिपूर्ती करण्यामध्ये तामिळनाडू व केरळ ही राज्ये पुढे आहेत. त्यामुळे दाव्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी त्यांच्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळाची तात्काळ भरती करण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीची प्रक्रिया १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी, यासाठी एक निश्चित कार्यशैली तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. महामंडळाची रूग्णालयांमध्ये कामगारांना योग्य सुविधा मिळण्यासाठी पीपीपी तत्त्वाचा वापर करावा. आवश्यक वाटल्यास अन्य रूग्णालयांशी टाय-अप करण्यात यावे, अशा सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या. कोल्हापूर, चाकण (पुणे), तारापूर (पालघर) आणि पेण (रायगड) येथे ईएसआयसीची रूग्णालये उभारण्यास तसेच बुटीबोरी येथील रूग्णालय ३ महिन्यामध्ये उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्य विमा महामंडळच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची ११२वी बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. या बैठकीस राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तसेच ईएसआयसीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, ईएसआयसीचे उपाध्यक्ष राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. निलिमा केरकट्टा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, महामंडळावर नियुक्त सदस्य ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते.

डॉक्टर, परिचारिकांची तातडीने भरती करणार – टोपे

रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी असल्याने ती तात्काळ भरण्यासाठी एमपीएससीप्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले. अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना योग्य सुविधा मिळाली नाही असे होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स तसेच नर्सेसची पदे भरण्यात यावी, त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले.

Related posts

देशातील जंगलांच्या क्षेत्रामध्ये २,२६१ चौरस किलोमीटर वाढ

Voice of Eastern

२४ कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सुशोभित केली भिंत 

Voice of Eastern

अभिनेता राम कपूर होणार रायगडवासी

Leave a Comment