मुंबई :
शालेय विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडींचे ज्ञान व त्यांच्यातील खगोल विषयातील जिज्ञासू वृत्ती वाढविण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये २५ खगोलीय प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर स्थापन करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून मांडलेल्या शैक्षणिक अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले.
पालिकेच्या २५ शाळांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये चार दुर्बिण (Telescope), स्पेक्ट्रोस्कोप, चंद्र दिनदर्शिका (MOON Calendar), खगोल छायाचित्रणाकरिता एक अॅडप्टर या वस्तू उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या या खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांमुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्रीय ज्ञान वाढीस लागेल, त्यांच्यात कुतूहल निर्माण होईल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खगोलीय बदलांचे निरिक्षण केल्याने त्यांच्यातील निरिक्षण, एकाग्रता आणि आकलन क्षमता वाढण्यास मदत होऊन संशोधन वृत्ती जागरुक करण्यास चालना मिळणार आहे. खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ७५ लाखांची तरतूद केली आहे.