मुंबई :
नवीन शैक्षणिक धोरण हे फारच क्लिष्ट आणि व्यापक असल्यामुळे त्याचा सखोल अभ्यासासाठी फार कालावधी जाईल, ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने ताबडतोब या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये प्र-कुलगुरूंची भेट घेत निवेदन दिले.
नवीन शैक्षणिक धोरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी फार कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्यक्षात धोरणाची अंमलबजावणीसाठी भरपूर वेळ आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज आहे. शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा मुद्दा असलेल्या क्रेडिट ट्रान्सफरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला विषय निवडण्याच्या स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट थांबवून पुन्हा सुरू करता येईल. त्यामुळे क्रेडिट ट्रान्सफरसारखी संकल्पना नीट राबवली जाणे फार गरजेचे आहे. या सर्व कामासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची अत्यंत गरज आहे, असल्याचे महाराष्ट्र शासन नवीन शैक्षणिक धोरण कार्यबल गटाचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल माहिती व्हावी यासाठी संलग्न परिसरातील महाविद्यालयांसाठी चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन करावे. अशी मागणी करणारे निवेदन मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांना देण्यात आले. यावेळी सिनेट सदस्य मिलिंद साटम, अॅड. वैभव थोरात, राजन कोळबकर व डॉ. धनराज कोहचाडे उपस्थित होते.