Voice of Eastern

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यातील सहा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया नुकत्याच संपुष्टात आल्या. या सहा अभ्यासक्रमांसाठी असलेल्या एकूण जागांपैकी ६५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये एलएलबी ५ या अभ्यासक्रमाच्या सर्वाधिक २९०३ जागा रिक्त राहिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलमार्फत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला यंदा काहीसा विलंब झाला होता. मात्र तरीही सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेचे योग्य नियोजन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यातूनच विद्यार्थ्यांना फारसा त्रास न होता प्रवेश प्रक्रिया राबवण्यात सीईटी सेलला यश आले. उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया काही दिवसांपासून सीईटी सेलकडून राबवण्यात येत होत्या. त्यातील सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या. यामध्ये एमएड, बीपीएड, बीएबीएससीबीएड, बीएडएमएड, एलएलबी ५ या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा संपुष्टात आल्या. या सहा अभ्यासक्रमांसाठी राज्यभरामधील विविध महाविद्यालयांमध्ये २२ हजार ४५६ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी सीईटी सेलकडून राबवण्यात आलेल्या चार फेर्‍यांमधून १५ हजार ९६५ जागांवर प्रवेश झाले. तर ६५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेल्या एलएलबी ५ या अभ्यासक्रमाच्या ११ हजार ७५५ जागांसाठी १३ हजार २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही ८८५२ जागांवर प्रवेश झाले. तर २९०३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे बीपीएडच्या ६११५ जागांसाठी ५१२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही ४४६२ जागांवर प्रवेश झाले. १६५३ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमएड अभ्यासक्रमाच्या २९८१ जागांसाठी १७३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बीएबीएससीबीएड ५५३ जागांपैकी १८९, एमपीएड ९९७ जागांपैकी १२९ तर बीएडएमएड अभ्यासक्रमासाठी ३५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही ५५ जागांपैकी फक्त २७ जागा शिल्लक राहिल्या आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षामध्ये प्रवेश घेण्याकडे कमी कल असल्याचे दिसून येत आहे. तर एलएलबी ३ वर्षे आणि बीएड या सर्वाधिक जागा असलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू असून, पुढील आठवड्यामध्ये यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Related posts

जगातील पहिले लेट्सगेटहैप्पी मानसिक आरोग्य अँपचे सुनील शेट्टीच्या हस्ते लाँच

दुचाकीचोराला भांडुप पोलिसांनी केली अटक

३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्राची उप उपांत्य फेरीत प्रवेश; यजमान कर्नाटकचीही विजयी वाटचाल

Leave a Comment