मुंबई :
मुंबईतील लोकल ट्रेन फलाटावर किती वाजता येणार याची अचूक वेळ ज्याप्रमाणे कळते तशी बेस्टच्या बसचीही कळावी, अशी इच्छा सर्वच मुंबईकरांची आहे. मात्र मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हे शक्य नसल्याचे आजपर्यंत सांगण्यात येत असे. परंतु यावर बेस्ट प्रशासनाने मात करत प्रवाशांना बेस्ट चलो अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बस स्टॉपवर कोणती बस किती वाजता येणार, याबाबतची अचूक वेळ कळण्यास मदत होणार आहे.
कामावर जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना अनेकदा बस वेळेत मिळत नसल्याने उशीर झाल्याची तक्रार प्रवाशांकडून होताना दिसत असते. तसेच बस कधी येणार हे माहित नसल्याने बराचकाळ बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागते. प्रवाशांना होणारा त्रास आता कमी होणार आहे. बेस्ट प्रशासनाने बेस्ट ‘चलो अॅप’ ही सुविधा सुरू केल्याने नागरिकांना घरबसल्या ऑनलाईच्या माध्यमातून बस किती वाजता कोणत्या स्टॉपवर येणार असल्याची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी प्रवाशांना हे अॅप डाऊनलोड करावे लागणर आहे. तसेच या अॅपच्या माध्यामातून ऑनलाईन तिकीट, पास मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुट्ट्या पैशांची किटकीट कायमची दूर होऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी होण्यास मदत होणार आहे. बेस्ट चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड सेवेचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.