मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयातील परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार एमजीएम महाविद्यालयाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या व द्वितीय वर्षाच्या ऑफलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु परीक्षेच्या तीन दिवस अगोदरच हे वेळापत्रक जाहीर केल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून येऊन परीक्षा द्यायची की राहायची सोय करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनकडून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षण ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. मात्र अद्यापही काही महाविद्यालयांकडून ऑनलाईन पद्धतीनेच शिकवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एमजीएम महाविद्यालयामध्येही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. मात्र परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनंतर महाविद्यालयाने ९ मार्च रोजी सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हे वेळापत्रक परीक्षेच्या अवघे तीन दिवस अगोदर जाहीर केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा ११ मार्चपासून सलग तीन दिवस घेण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाने परिपत्रक काढले आहे. या महाविद्यालयामध्ये औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, रत्नागिरी औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यांमधील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. महाविद्यालयाचे वसतिगृह नसल्याने विद्यार्थी एकत्रित येऊन आसपासच्या भागामध्ये घरे भाड्याने घेऊन राहतात. मात्र कोरोनामुळे हे विद्यार्थी आपल्या मूळ गावी होते. त्यातच महाविद्यालयाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवल्यानंतर परीक्षा थेट ऑफलाईन जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघ्या दोन दिवसांमध्ये मूळ गावाहून मुंबईत येऊन राहण्याची सोय करणे आणि परीक्षेचा अभ्यास करणे अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही बाब लक्षात आल्यावर मुंबई विद्यापीठाचे युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, शिवसेना सोशल मीडिया समन्वयक पराग मोहिते, उपविधानसभा अधिकारी महेश भिसे, प्रिती आवटे, जय कुष्टे व अन्य पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने तातडीने महाविद्यालयात धाव घेत प्राचार्य डॉ. गीता लाटकर यांची भेट घेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा तीन दिवस मुदतीमध्ये घेण्याचा निर्णय बदलून विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यावर प्राचार्यांनी सकारात्मकता दर्शवत परीक्षेसाठी पुरेसा वेळ देण्यात येईल, असे आश्वासन युवासेनेला दिले.