Voice of Eastern

मुंबई

कर्नाटकमध्ये बंगळूर हायवेवरून सात हजार महागडे मोबाईल फोन घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाला धाक दाखवून मोबाईल लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने अटक केली. त्यांच्याकडून ६९ लाख रुपये किमतीचे ४९५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचा कक्ष ७ च्या पथकाने घाटकोपर येथे ही कारवाई केली असून हे दोघे जण दरोड्यातील मोबाईल फोनची विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते.

विजय शेट्टी आणि नितेश कसेरा असे अटक केलेल्यांची नावे असून एक जण मध्यप्रदेश आणि दुसरा नवीन पनवेल येथे राहणार आहे. याप्रकरणी कर्नाटकमध्ये मुलबागल ग्रामीण पोलिसांनी पळून गेलेल्या आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता. या आरोपींचा शोध सुरु असतानाच या गुन्ह्यांतील काही आरोपी चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घाटकोपर येथील गारुडिया नगर परिसरात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे दोनजण एक टेम्पो घेऊन आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना प्रभारी मनिष श्रीधनकर, सुधीर जाधव, स्वप्निल काळे व अन्य पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. टेम्पोची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल सापडून आले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. ५ सप्टेंबरला या दोघांनी आपल्या इतर सहा साथीदारांसह बंगळूरू हायवेवर एका ट्रक लुटला होता, या ट्रकमध्ये नवे कोरे एमआय रेडमी कंपनीचे नवेकोरे ७ हजार मोबाईल फोन होते. या आठ जणांच्या टोळीने ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल फोनने भरलेल्या ट्रकसह पोबारा केला होता. या दोघांनी आलेल्या दोघांनी पाचशे मोबाईल फोन विकण्यासाठी मुंबईत आणले होते, त्यापॆकी काही नमुना म्हणून दुकानदाराला दाखवण्यासाठी आले असताना या दोघांना घाटकोपर येथून अटक करण्यात आली आहे. या दोघांजवळून ४९५ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या मोबाईलच खरेदी बिलाच्या पावतीविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी ते मोबाईल कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यांच्या मुलबागल-कोलार हायवेमधील दरोड्याचे असल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची किंमत ६९ लाख रुपये असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकार यांनी दिली आहे. या दोघांच्या अटकेची मुलबागल ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असून त्यांचे एक पथक लवकरच मुंबईत येणार आहे. त्यानंतर या दोघांनाही चोरीच्या मुद्देमालासह संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts

विद्यार्थ्याच्या सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी आता ‘सखी सावित्री’

कर्करोगाबाबत टाटा रुग्णालय देणार जगाला प्रशिक्षण

बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज परीक्षेचा निकाल जाहीर

Leave a Comment