मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यवासासियक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या एमएचटी-सीईटी २०२२ ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी नोदणी करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २३ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलकडून १० फेब्रुवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार होते. तर विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांना ७ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी अर्ज भरण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना कोणतेही विलंब शुल्क न भरता अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे १६ ते २३ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून अर्ज नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना २३ एप्रिलला रात्री ११.५९ वाजेपर्यंत शुल्क भरता येणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.