मुंबई :
विवाहबाह्य संबंधातून अनेकदा पतीचा किंवा पत्नीचा प्रियकर किंवा प्रेयसीच्या मदतीने काटा काढल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र प्रियकराने प्रेयसीच्या चार महिन्यांच्या मुलीला चक्क ४ लाख ८० हजार रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गिरगावमध्ये राहत असलेली अन्वरी अब्दुल रशीद शेख या महिलेला चार महिन्यांची मुलगी आहे. तसेच तिचे त्यांच्याच सोबत राहत असलेल्या इब्राहिमसोबत प्रेमसंबंध होते. २७ डिसेंबरला ती कामावरून घरी आल्यानंतर तिची चार महिन्यांची मुलगी घरात दिसली नाही. तिने सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच सापडली नाही. सात दिवस शोधाशोध केल्यानंतर मुलीचे इब्राहिमनेच अपहरण केल्याची खात्री होताच तिने पोलीस ठाण्यात इब्राहिमविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन व्ही. पी. रोड पोलिसांनी इब्राहिमविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची तीन विशेष पथके कामाला लागली. या पथकाने तांत्रिक माहितीसह सीसीटिव्हीच्या मदतीने इब्राहिमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी शीव, धारावी, जोगेश्वरी, नागपाडा, आणि कल्याण येथे धाडी टाकल्या. त्यामध्ये दोन महिला व चार पुरुषांना अटक केली. त्यांच्या चौकशीत मुलीला तामिळनाडूमध्ये विकल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिलीप तांबे, अभिजीत देशमुख व अन्य पोलीस पथकाला तामिळनाडूला पाठविले. या पथकाने तिथे पाळत ठेवून या मुलीला सेवलानपट्टी येथून ताब्यात घेतले. तेथे एका महिलेसह अन्य चौघांना अटक केली. या सर्वांना मुंबईत आणण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत त्यांनी मुलीची विक्री ४ लाख ८० हजार रुपयांना केल्याचे समजले. या कारवाईत पोलिसांनी ४४ हजारांची रोख रक्कम आणि १५ हजारांचा मोबाईल ताब्यात घेतला. मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले असून पुढील आदेश येईपर्यंत तिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. दरम्यान इब्राहिमने ही मुलगी आपलीच असल्याचा दावा केल्याने त्या दोघांची डीएनए चाचणी होणार आहे. त्याचा अहवालानंतर याबाबत खुलासा होऊन, तपासाला दिशा मिळेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.