Voice of Eastern

मुंबई / ठाणे :

गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके गणराय आणि गुरुवारी माहेरवाशीण म्हणून मुक्कामी आलेल्या गौराई मातेला शनिवारी गणेशभक्तांनी साश्रु नयनाने निरोप दिला. यावेळी पुढच्या वर्षी लवकर या..! असे म्हणत गणेशभक्तांसह गौराई मातेच्या भक्तांचे मन दाटून आल्याचे पाहण्यास मिळाले. शनिवारी दुपारपासूनच वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. मात्र पावसाची तमा न बाळगात भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत मोठ्या उत्साहात निरोप दिला. मुंबईमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईमध्ये ८ हजार १९८ गौरीगणपतींसह सार्वजनिक गणपतींना तर ठाणे जिल्ह्यात ४८ हजार २५४ घरगुती आणि सार्वजनिक गणरायांसोबत २० हजार ७३७ गौराई मातेला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. याचदरम्यान गणरायाला डोळे भरून पाहण्यासाठी विसर्जनस्थळी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली होती.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर शनिवारी भरपावसातही बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने ही चौकाचौकात तसेच विसर्जन घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली होती. दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनाला कृत्रिम तलावांमधील श्रींच्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत पाच दिवसांसाठीही प्रशासनाने तयारी सज्ज ठेवली होती.

मुंबईमध्ये ८ हजार १९८ गौरीगणपतींचे विसर्जन

पाच दिवसांचा मुक्काम करून गौराई मातेसह लाडक्या गणरायाच्या विसर्जनावेळी गणेशभक्तांचे मन दाटून आले, पुढच्या वर्षी लवकर या..! च्या जयघोषात भाविकांनी भरपावसात गणरायाला निरोप दिला. मुंबईमध्ये कोणताही गालबोट न लावता सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध विसर्जनस्थळी ८ हजार १९८ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ७ हजार ९३८ गणपतींसोबत ७३९ गौरींचे तर ६१ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावामध्ये ३ हजार ४४८ गौरीगणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. यामध्ये ३ हजार ११९ गणपतींसह ३०० गौरी व २९ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून विसर्जनस्थळी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना भाविकांना अश्रु अनावर झाले होते.

ठाणे जिल्ह्यात ४८ हजार २५४ गणरायांना निरोप

ठाणे जिल्ह्यातील ४८ हजार २५४ घागुती आणि सार्वजनिक बाप्पांना तर, २० हजार ७३७ गौराईनां भक्तिभावाने निरोप दिला. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील ३९ हजार ८६४ घरगुती, तर, १४६ सार्वजनिक गणपती बाप्पांना तसेच १४ हजार ८४५ गौराईमातेला निरोप देण्यात आला. तर, ग्रामीण भागातील ८ हजार १२५ घरगुती, तर, ११९ सार्वजनिक गणपती बाप्पांना तसेच ५ हजार ८८२ गौराई मातेला साश्रु नयनाने निरोप देण्यात आला.

Related posts

‘टायगर का मेसेज’साठी सलमान खानचे जगभरात कौतुक

अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये संशोधनासाठी आयआयटी कानपुरचे अपोलो हॉस्पिटल्ससोबत सामंजस्य करार

Voice of Eastern

मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक औषधांच्या विक्रीत आठवडाभरात ५० कोटीने वाढ

Leave a Comment