Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

डोंबिवलीत कुंभारखाणपाडा खाडीत चिमकुलीसह वडील बुडाले; अग्निशमन दलासह पोलिसांकडून शोधकार्य सुरू

banner

कल्याण :

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा खाडी किनारी शनिवारी दुपारी दीड वाजता खेळताना अडीच वर्षांची मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचविण्यासाठी वडिलांनी ही पाण्यात उडी घेतली. मात्र मुलीसह वडील वाहून गेले. अग्निशमन दल, पोलिसांच्या पथकांंनी सलग पाच तास शोध घेऊनही बुडालेल्या दोघांचा शोध लागलेला नाही. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनिल सुरवाडे (४०, रा. राजूनगर), हिरा सुरवाडे (अडीच वर्ष) अशी खाडीत वाहून गेलेल्या वडील आणि मुलीची नावे आहेत. अनिल हे कुटुंबीयांसह राजूनगर भागात राहतात. त्यांना पत्नी, एक मुलगी आहे. मिळालेली माहिती, अशी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान अनिल सुरवाडे आपली चिमकुली मुलगी हिरा हिला येऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी खेळण्यासाठी घेऊन आले होते. खाडीला ओहटी होती. खाडीत जाण्यासाठी काँक्रीटचा उतार कट्टा (जेट्टी) आहे. या उतार कट्ट्याच्या खाडीकडील भागात हिरा खेळणी सोबत खेळत होती. खाडीत वस्तू फेकून आनंद घेत होती. खेळताना तिने पायातील चपला काढून ठेवल्या होत्या. तिचे कपडे बाजुला ठेवले होते. ती खेळत असल्याने वडील तिच्यापासून काही अंतरावर बसले होते.

खेळताना हिरा उतार जेट्टीच्या एकदम कडेला गेली. तिचा तोल जाऊन ती खाडीत पडली. मुलगी खाडीत पडून वाहून जात असल्याचे निदर्शनास येताच वडील अनिल यांनी धावत जाऊन खाडीत उडी मारली. खाडी किनारी गाळ, पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने मुलगी वाहून गेली. तिला वाचविताना अनिल यांना किनाऱ्यावरील गाळ, खाडीतील दुर्गंधीयुक्त पाणी यांचा अडथळा आला. त्यामुळे वाहत्या पाण्याबरोबर अनिल वाहून जाऊ लागले. ते स्वत:चा बचाव करू शकले नाहीत. दहा फुटापर्यंत ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. बचावासाठी त्यांनी हात वर केले आणि ते कायमचे बुडाले.

उतार जेट्टीपासून काही अंतरावर दोन तरूण एका झाडाखाली बसले होते. त्यांना अनिल यांनी बुडताना वर केलेला हात पाहिला. या दोन्ही तरूणांना खाडी किनारी वडील आणि त्यांची चिमुकली मुलगी अचानक गायब दिसल्याचे दिसले. किनाऱ्यावर मुलीचे चप्पल, खेळातील बाहुल्या, तिचे कपडे पडले होते. खाडी किनारी खेळत असलेली चिमुकली आणि तिचे वडील खाडीत पडून वाहून गेल्याची खात्री पटल्यावर या दोन्ही तरूणांनी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना संपर्क केला.

खंदारे यांनी तातडीने पालिकेच्या गरीबाचापाडा येथील अग्निशमन केंद्राला माहिती दिली. अग्निशमन जवान आणि पोलिसांची पथके तातडीने कुंभाऱखाणपाडा खाडी किनारी पोहचली. त्यांनी कुंभारखाणपाडा, राजूनगर ते देवीचापाडा खाडी किनारा असा पाच ते सहा किलोमीटरचा खाडीचा पट्टा बोटीच्या साहाय्याने शोधला. परिसरात बाळ किंवा वडील आढळून आले नाहीत. शोध पथकाने पुन्हा देवीचापाडा ते कुंभारखाणपाडा अशी उलट्या दिशेने शोध मोहीम राबवली. खाडी किनारच्या खारफुटीत दोघे अडकलेत आहेत का याचा शोध घेतला. बुडालेल्या व्यक्ती संध्याकाळी उशिरापर्यंत आढळून आल्या नाहीत. त्यांचे शोधकार्य अग्निशमन जवानांनी प्रखर झोताचे दिवे लावून सुरूच ठेवले आहे.

खाडी किनारी येणाऱ्या पोहच रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बुडालेल्या व्यक्तींची ओळख पोलिसांनी पटवली. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. ओहटीमुळे या दोन्ही व्यक्ती खाडीच्या आतील खोल भागात खेचल्या गेल्या असाव्यात. २४ तासानंतर त्या खाडी किनारी लागण्याची शक्यता तपास पथकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related posts

हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचा ‘कामगार मित्र’ पुरस्काराने गौरव

स्वातंत्र्यदिनानिमित्त मशीदीमध्ये अन्य धर्मीय तरुणांनी केले रक्तदान

‘सर्जा’ चित्रपटातील ‘धड धड…’ गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला

Leave a Comment