मुंबई :
राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून वर्षभरात विविध मोहीमा राबवण्यात येतात. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत एफडीएच्या अन्न विभागाने मुंबईमध्ये तब्बल २८ ठिकाणी धाडी घातल्या. या धाडीतून एफडीएने ४८८ संशयास्पद नमूने तपासण्यासाठी घेतले आहे.
मुंबईतील अनेक हॉटेलमध्ये स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जातात. तर अनेक अन्न पदार्थांचा दर्जाही राखला जात नाही. त्यामुळे नागरिकांची दिशाभूळ करत त्यांना निकृष्ट, भेसळयुक्त अन्न पदार्थ विकणार्यांवर एफडीएकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. याचपार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यात एफडीएचे अधिकारी व कर्मचार्यांनी मुंबईतील विविध २८ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये त्यांनी ४८८ संशयास्पद नमूने जप्त केले आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीतून ३३५ नमूने तपासणीसाठी घेतले आहेत. नागरिकांना उत्तम अन्न पदार्थ मिळावेत यासाठी सतर्क असलेल्या एफडीएने गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्डा, मावा यासारख्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणार्या ३८ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडीमध्ये एफडीएने ३५ लाख ९७३ रुपयांचा साठा जप्त केला. तसेच या प्रकरणी १६ आस्थापनांविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकर यांनी दिली. सध्या सणासुदीच्या काळामध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणार्यांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.