Voice of Eastern

मुंबई :

एमजीएम महाविद्यालयाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या व द्वितीय वर्षाच्या ऑफलाईन परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या अवघे तीन दिवस अगोदर जाहीर केले. त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. यासंदर्भात ‘एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची कसरत’ या मथळ्याखाली ‘Voice Of Eastern’ने बातमी प्रकाशित केली. तसेच युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा करून विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत अखेर प्रशासनाने २२ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनंतर एमजीएम महाविद्यालयाने ९ मार्च रोजी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा ११ मार्चपासून सलग तीन दिवस घेण्यात येईल, अशा स्वरुपाचे परिपत्रक काढले. परीक्षेच्या अवघे तीन दिवस अगोदर परिपत्रक काढल्याने कोरोनामुळे आपल्या मूळ गावी गेलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. या महाविद्यालयामध्ये औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, रत्नागिरी औरंगाबाद, नाशिक, अमरावती, पुणे, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे वसतिगृह नसल्याने विद्यार्थी एकत्रित येऊन आसपासच्या भागामध्ये घरे भाड्याने घेऊन राहतात. त्यामुळे महाविद्यालयाने अचानक परिपत्रक काढत तीन दिवसांची वेळ दिल्याने विद्यार्थ्यांसमोर परीक्षेचा अभ्यास करायचा की घर शोधायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाचे युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात, शिवसेना सोशल मीडिया समन्वयक पराग मोहिते, उपविधानसभा अधिकारी महेश भिसे, प्रिती आवटे, जय कुष्टे यांच्या शिष्टमंडळाने तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता लाटकर यांची भेट घेतली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली. या विनंतीची दखल घेत प्राचार्‍यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २२ मार्चपर्यंत पुढे ढकलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

Related posts

मेस्टाने सुरू केल्या ग्रामीण भागातील शाळा

मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा – महेश तपासे

आयआयटी मुंबईचा देशात डंका

Voice of Eastern

Leave a Comment