मुंबई :
पुण्यात दर महिन्याला होणारे बाईक जळीत कांड मुंबईत देखील होऊ लागले आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे. कारण आज मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मुंबईच्या भांडुप भागातील रमाबाई नगरात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली, आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाला परिसरात पसरल्या होत्या .या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
भांडुपच्या रमाबाई नगर तुळजाभवानी मंदिरा जवळ पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि रिक्षा काही अज्ञातांनी जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली परिसरातील नागरिकांना मंदिराजवळ काही गाड्या जळत असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत या परिसरात पार्क केलेल्या सात दुचाकी एक रिक्षा आणि एक कार जळाली होती. स्थानिकांच्या मते या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा राबता असतो त्यांच्याकडूनच हे कृत्य झालं असल्याचा संशय आहे. दरम्यान भांडुप पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.