मुंबई :
अनेकदा प्रवासामध्ये बसमध्ये इंजिनला आग लागल्याने प्रवासी अडकून किंवा गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशावेळी प्रवाशांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी प्रवासी गाड्यांमध्ये प्रवासी बसण्याच्या ठिकाणी गाडीमध्ये धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी प्रणाली (Alarm warning system) आणि आग संरक्षक प्रणाली (Fire protection system) बसविण्यासाठी यावी, अशी अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and Highways) जारी केली आहे. त्यामुळे आता सर्व प्रवासी बस गाड्यांमध्ये आणि शालेय मुलांच्या बसगाड्यांमध्ये यंत्रणा बसवणे बंधनकारक ठरणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २७ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रवासी गाड्यांमध्ये जेथे प्रवासी बसतात तेथे गाडीमध्ये धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी प्रणाली आणि आग संरक्षक प्रणाली वाहन मालकांना बसवावी लागणार आहे. त्यासाठी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड १३५ नुसार (एआयएस) टाईप-तीनच्या वाहनांच्या रचनेमध्ये आणि बांधणीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. टाईप-तीनच्या वाहनांचा उपयोग शालेय मुलांच्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो.
सध्या, एआयएस १३५ नुसार इंजिनाच्या भागामध्ये आग लागली तर ते लक्षात आणून देण्यासाठी गजर वाजवण्यात येतो. प्रवासी गाड्यांना लागलेल्या आगींच्या कारणांचा आणि या प्रकारच्या अपघातांचा अभ्यास केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड होवून आग लागल्यानंतर प्रवाशांना ते असलेल्या भागात निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि धूर यामुळे जास्त दुखापत आणि त्रास होत असल्याचे लक्षात आले. प्रवासी गाडीला आग लागल्यावर आत निर्माण झालेल्या उष्णतेचे व्यवस्थापन करून गाडीतल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ मिळू शकतो. उष्णता आणि धूर यावर नियंत्रण मिळवल्यास प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण कमी करता येईल किंवा टाळताही येऊ शकेल. यासाठी गाडीमध्ये पाण्याच्या वाफेवर आधारित सक्रिय अग्निसुरक्षा प्रणाली आणि गाड्यांसाठी वेगळी आगीची सूचना देणारी गजर यंत्रणा प्रवाशांच्या ठिकाणी बसविणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या भागातले तापमान ५० अंश सेल्सीअसपर्यंत राखण्यासाठी गाड्यांची नवीन संरचना करावी लागणार आहे. यासाठी आगप्रतिबंधक नवीन प्रमाणित संरचना निश्चित करण्यासाठी अग्निशमन तंत्रज्ञान, जोखीम मूल्यांकन, सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (सीएफईईएस), डीआरडीओ या संस्थेतील अधिकाऱ्यांसोबत संबंधितांबरोबर चर्चा करण्यात आली आहे.