नवी मुंबई :
१४ मे रोजी जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा केला जातो. फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख मिळालेल्या नवी मुंबईमध्ये १४ मे रोजी पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. जगातील स्थलांतरित पक्षी सध्या धोक्यात आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचा धोका कमी करण्यासाठी, त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज यादृष्टीने जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस महत्त्वाचे ठरते.
नवी मुंबईतील हे फ्लेमिंगो महोत्सव डीपीएस सरोवरावर येथे होणार असून डीपीएस शाळेच्या प्रवेशद्वार क्रमांक पाचवरून ऑडटोरियममधील प्रदर्शनाकडे जाता येईल. हा कार्यक्रम म्हणजे डब्ल्यूबीएमडी ग्लोबल इव्हेंटच्या सूचीचा भाग आहे. त्याची सुरुवात दुपारी १२ वाजता होऊन संध्याकाळी ६ वाजता समारोप होईल. या कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी मोफत असून त्यात सर्वांचे स्वागत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जैवविविधतेच्या दृष्टीने पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे स्मरण या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला होणार आहे, असे खारघर वेटलँड अँड हिल्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. छायाचित्र प्रदर्शन, कांदळवन आणि पाणथळीवर आधारित शैक्षणिक दिखावे, फ्लेमिंगो नृत्य आणि कला कार्यक्रम हा नवी मुंबई फ्लेमिंगो फेस्टिव्हलच्या धमालीचा भाग असेल अशी माहितीही त्यांनी दिली.
सुमारे १३९ वर्षांपासून निसर्ग संशोधनात कार्यरत असलेली बीएनएचएस, नवी मुंबई महानगर पालिका (एनएमएमसी), महाराष्ट्र मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन, गोदरेज मँग्रोव्ह फाऊंडेशन, बाह्य उपक्रम संघटना वँडरींग सोल्स, निकॉन आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांनी या कार्यक्रमाला आपले पाठबळ दर्शवले आहे.