मुंबई
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पालिकेसह राज्य सरकार सज्ज झाली आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात आलेल्या सण उत्सवांमुळे रस्त्यांवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षात मागील १२ दिवसांची आकडेवारी पाहता राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार होत असून, मृत्यूच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे.
सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून बाजारामंध्ये गर्दीत वाढ होत आहे. ही वाढती गर्दी कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देऊ शकते असे मत तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे महापालिका व राज्य सरकारकडून कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्याची तयारी केली आहे. १ सप्टेंबरला जवळपास साडेचार हजारच्या घरात असलेल्या रुग्णसंख्येत त्यानंतर दिवसांमध्ये हळूहळू घट पाहायल मिळत आहे. ही रुग्णसंख्या थेट ३६०० पर्यंत खाली आली. त्यानंतर पुढील तीन दिवस पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या चार हजारच्या घरात गेली. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या पुन्हा तीन हजारच्या घरात आली आहे. रुग्णसंख्येत चढउतार होत असला तरी मृतांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. १ सप्टेंबरला १८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र पुढील दिवसांमध्ये मृतांच्या संख्या घटत असून, १२ सप्टेंबरला मृतांची संख्या ४६ पर्यंत कमी झाली आहे. ऐन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णसंख्येतील चढउतारामुळे कोरोना वाढीबाबत भीती निर्माण झाली असली तरी कोरोनाच्या मृतांच्या संख्येत होणारी घट राज्यासाठी दिलासा देणारी आहे.