मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असताना बुधवारी तब्बल दोन वर्षाने राज्यामध्ये प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत असले तरी कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणणे हे आरोग्य विभागासमोर मोठे संकट होते. मात्र बुधवारी कोरोना रुग्णांच्या मृतांची नोंद शून्य झाल्याने ही बाब राज्यासाठी दिलासादायक ठरली आहे. राज्यात बुधवारी ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांची संख्या ७८,६६,९२४ झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पूर्णत: रोखणे हे राज्याच्या आरोग्य विभागासमोर आव्हान होते. त्यादृष्टीकोनातून राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूही होते. या प्रयत्नांना यश मिळाले असून, बुधवारी राज्यामध्ये तब्बल दोन वर्षाने शून्य मृत्यूची नोंद झाली झाली. १ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाज राज्यात २ मार्च २०२२ रोजी शून्य मृत्यूची नोद झाली आहे. राज्यातील मृतांची संख्या १ लाख ४३ हजार ७०६ इतकी असून, मृत्यूदर हा १.८२ टक्के एवढा आहे. राज्यातील मृत्यूची शून्य नोंद होत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के इतके आहे. राज्यात बुधवारी १००७ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत ७७ लाख १३ हजार ५७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात बुधवारी ५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांची संख्या ७८,६६,९२४ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६४३ इतकी आहे.
ओमायक्रॉनचे ३८ नवे रुग्ण
राज्यात ओमायक्रॉनचे ३८ नवे रुग्ण बुधवारी आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमार्फत करण्यात आले आहेत. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पुणे मनपा ३७ आणि औरंगाबादमध्ये १ रुग्ण सापडला आहे. राज्यात एकूण ४७७१ ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. यापैकी ४६२९ रुग्णांची निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.