मुंबई :
कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना गत आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येने दिलासा दिला आहे. मुंबईसह राज्यामध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. मुंबईमध्ये रविवारी ७८९५ तर राज्यामध्ये ४१,३२७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यामध्ये काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
गतआठवड्याच्या मध्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसून येत आहे. राज्यामध्ये रविवारी ४१,३२७ कोरोना रूग्ण सापडले. मात्र, १३ जानेवारीपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. १३ जानेवारीला राज्यामध्ये ४६,४०६ कोरोना रुग्ण सापडले होते. त्यानंतर १४ जानेवारी ४३,२११, १५ जानेवारीला ४२,४६२ रुग्ण सापडले. म्हणजेच चार दिवसांमध्ये राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. मुंबईमध्ये १६ हजारांच्या घरात असलेली कोरोना रुग्णसंख्या ४ दिवसांमध्ये ७ हजारांवर आली आहे. मुंबईमध्ये रविवारी ७८९५ रुग्ण सापडले. १२ जानेवारीला मुंबईमध्ये १६,४२० रुग्ण, १३ जानेवारीला १३,७०२ रुग्ण, १४ जानेवारीला ११,३१७ रुग्ण, १५ जानेवारीला १०,६६१ इतके रुग्ण सापडले. म्हणजेच पाच दिवसांमध्ये तब्बल ९ हजारांनी रुग्णसंख्येत घट झाली आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण
राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण रविवारी आढळले आहेत. यामध्ये पुणे मनपा ५, पिंपरी-चिंचवड ३ यांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १७३८ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ९३२ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.