मुंबई :
लायसन्स काढणे, गाडी पासिंग करणे यासारख्या विविध कामासाठी पूर्व उपनगरातील नागरिकांना वडाळा येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र या आरटीओ कार्यालयात जाणे हे आर्थिकदृष्ट्या आणि प्रवासाच्यादृष्ट्या सोयीस्कर ठरत नाही. त्यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना या आरटीओ कार्यालयात जाणे हे जिकरीचे ठरते. परिणामी मुलुंडमधील जकात नाक किंवा ऐरोली जकात नाका या रिक्त जागेवर पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी आरटीओ कार्यालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
मुलुंड ते घाटकोपरदरम्यान सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक असलेली वस्ती आहे. या भागात सध्या होत असलेल्या विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. सद्यस्थितीत असलेले आरटीओ हे उपनगराबाहेर वडाळा येथे आहे. त्यामुळे लोकांची खूपच गैरसोय होत आहे. तसेच नागरिकांचा संपूर्ण दिवस खर्ची पडतो. नागरिकांना या कामासाठी सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे पूर्व उपनगरात आरटीओ उभारण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी उपस्थित केली आहे. आरटीओ कार्यालय उभारण्यासाठी त्यांनी मुलुंड जकात नाका पूर्व, मुलुंड जकात नाका पश्चिम, ऐरोली जकात नाका या पर्यायी जागा सुचवल्या आहेत. पर्यायी जागांपैकी एका जागेवर आरटीओ कार्यालयाची व्यवस्था व्हावी, जेणेकरून पूर्व उपनगरातील नागरिकांची चांगली सोय होईल. यासंदर्भात भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून पूर्व उपनगरात आरटीओ कार्यालय उभारण्याबाबत भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक शेरा दिला आहे.