मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हा महाराष्ट्राचा सैनिकी स्थापत्य व गनिमी कावा युद्धनीती आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून प्राथमिक अवस्थेत युनेस्कोने स्वीकार केला आहे, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या नामांकनाचा अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत प्रगतिपथावर असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
सागरी किल्ल्यांच्या विकासाचा व जागतिक नामांकनाचा प्रस्ताव आणि मुंबईतील किल्ल्यांचा विकास कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. युनेस्कोद्वारा जागतिक वारसा दिन १८ एप्रिल रोजी केला जात असला तरी त्या काळात शैक्षणिक संस्था बंद असल्याने प्राचीन वारसा संबंधी जनजागृती मुख्यतः नवीन पिढीत व्हावी यासाठी भारत सरकार संस्कृती मंत्रालय यांच्याद्वारे जागतिक वारसा सप्ताह नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाद्वारे संरक्षित एकही स्मारक युनेस्कोद्वारा जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले नव्हते. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार करण्यात आला आहे.
राजगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, खर्डा, गाळणा इत्यादी किल्ल्यांवर तर सिंदखेड राजा येथील स्मारके, भीमाशंकर सुंदर नारायण नीरा नरसिंगपूर येथील मंदिरांचे जतन संवर्धन आता प्रगतिपथावर आहे. येथील संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतिपथावर आहे. सातारा येथील शस्त्र संग्रह, नागपूर व औंध येथील चित्रसंग्रह इत्यादींच्या हाय रेझोल्यूशन फोटोग्राफीचे काम पूर्ण झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली.