मुंबई :
सुमारे ९२ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी राव आयआयटी अॅकडमी ऊर्फ राव एडू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन मालकाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विनयकुमार पांडे आणि यामिनी राव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर पुस्तकाच्या छपाईचे पेमेंट न करता एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप असून या गुन्ह्यांचा साकिनाका पोलिसाकडून तपास सुरु आहे.
धारावी परिसरात राहणारे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची प्रिटींग प्रेस आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांची राव आयआयटी अॅकडमी ऊर्फ राव एडू सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी एक करार झाला होता. कंपनीचे शहरात विविध ठिकाणी खाजगी क्लासेस आहे. या क्लासेससाठी लागणार्या पुस्तकाच्या छपाईचे कंत्राट तक्रारदाराच्या कंपनीला देण्यात आले होते. त्यांनी सात वर्षांत कंपनीच्या ९२ लाख रुपयांच्या पुस्तकाची छपाई करुन त्याची डिलीव्हरी कंपनीच्या विविध शाखांमध्ये केली होती. त्याचे पेमेंट एकाच वेळेस करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र सात वर्षांत त्यांनी ९२ लाख रुपयांचे पेमेंट केले नव्हते. वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनी डिसेंबर २०२० त्यांना ९२ लाख रुपयांचा एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याबाबत विनयकुमार आणि यामिनी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याकडे सध्या पैसे नसून पैसे आल्यानंतर त्यांचे पेमेंट केले जाईल असे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु केली होती. त्यामुळे शुक्रवारी २९ एप्रिलला बाबूराव संकटोल यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन्ही मालकाविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा आणि प्राप्त कागदपत्रावरुन पोलिसांनी विनयकुमार पांडे आणि यामिनी राव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.