मुंबई :
कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील जोरदार तयारी सुरू ठेवली आहे.
मुंबई महापालिकेने लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र केली असून नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य आणि दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी घाटकोपर हे जंक्शन मानले जाते. त्यामुळे पहिला आणि दुसरा डोससाठी घाटकोपर एन वार्ड पालिकेच्या वतीने घाटकोपर मेट्रो स्थानकावर लसीकरण मोहीम सुरू केले आहे. एन वार्ड पालिकेचे सहायक आयुक्त संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र खंदारे यांनी घाटकोपर मेट्रो व्यवस्थापकांच्या सहकार्याने ही मोहीम दोन आठवडे राबवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते सांय ४ पर्यंत प्रवाशांसाठी कोव्हीशिल्ड लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मेट्रो व्यवस्थापकाचे नरेंद्र गांगुर्डे यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले आहे. सध्या दररोज ४० हुन अधिक प्रवासी डोस घेत आहेत. मेट्रो व्यवस्थापकांनी परवानगी दिली तर रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण राबवण्यात येईल. सकाळी कामावरुन घरी परतताना नागरिक स्थानकावर डोस घेऊन घरी जाऊ शकतात. त्यामुळे लसीकरण तर होईल मात्र वेळ देखील बचत होईल. ओमीक्रॉनला रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे असे डॉ समीर करंजीकर यांनी सांगितले.