मुंबई :
धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची अनेक कामे रखडण्याबरोबरच लांबच्या प्रवासातील त्यांचा विरंगुळाही होत नाही. लोकल प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी लोकलमध्ये वायफाय सेवा देण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता नववर्षात पूर्ण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे नववर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकलमध्ये नि:शुल्क वायफाय सेवा मिळणार आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार मध्य रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने सर्व रेल्वे स्थानकावर वायफायची सुविधा उपलब्ध केली. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने लोकल डब्यामध्ये वायफाय लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६५ लोकलमधील ३ हजार ४६५ डब्यात वायफाय बसवण्यात येणार आहे. मात्र दीड वर्षांपूर्वी अचानक आलेल्या कोरोनामुळे मध्य रेल्वेचा हा प्रकल्प रखडला. मात्र रेल्वेने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता कंबर कसली आहे. नववर्षात प्रवाशांना प्री-लोडेड वायफाय उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार खासगी कंपनीमार्फत ३ हजार ४६५ डब्यात वायफाय लावण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
‘प्री-लोडेड’ वायफायची सुविधा
‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये सुरू करण्यात येणार्या सुविधेमध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी पाहता येणार आहेत. प्रवाशांनी मोबाइल वायफाय सुरू केल्यानंतर त्यांना लॉग-इन करणे आवश्यक आहे. लॉग इन केल्यानंतर प्रवाशांना ‘प्री-लोडेड’ माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होणार आहे.