मुंबई :
मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीसोबत इंग्रजीची सवय पहिलीपासूनच व्हावी यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी असे दोन्ही एकत्रित शिकता येणार आहे. त्यानुसार बालभारतीला उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
We are committed to the introduction of integrated & bilingual textbooks in all Marathi medium schools from the next academic year 1st Std. onwards. Reviewed the preparedness of the initiative with senior department officials today. pic.twitter.com/Ulqw5XM66w
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 13, 2022
मुलांना पहिलीपासूनच मराठीसोबत इंग्रजीची सवय लावल्यास त्यांना पुढे इंग्रजी शिकण्यास अवघड जाणार नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले होते. त्यानुसार त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच मराठी व इंग्रजी असे दोन्ही शब्द असलेली पुस्तके मिळणार आहेत. यामध्ये मराठी शब्द आणि वाक्यांसह इंग्रजी मजकूर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. जेणेकरून मुले मूलभूत इंग्रजी शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना शिकू शकतील. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना मराठी शब्द इंग्रजी शब्दासह शिकण्यास मिळाल्यास त्यांचे हळूहळू इंग्रजीचे ज्ञान अधिक चांगले होण्यास मदत होईल. त्यामुळे मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती कमी होण्यास मदत होईल व त्यांच्या मनातील इंग्रजीची भीती कमी होऊन इंग्रजीची आवड निर्माण होण्यास मदत होईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी बालभारती व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत या उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बालभारतीला उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणण्याची सूचना केली आहे. राज्यातील ४८८ शाळांमध्ये पायलट प्रकल्प यापूर्वीच यशस्वीरित्या राबवण्यात आला असून, त्याला विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.