मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महिनाभरापूर्वी उद्घाटन झालेल्या घाटकोपर -मानखुर्द लिंक रोड पुलावर महिनाभरात तब्बल 29 अपघात झाली आहे. पुलावरील डांबरी रस्ते पावसामुळे गुळगुळीत झाल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत असून, हा उड्डाणपूल दुचाकी स्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. सोमवारी या उड्डाण पुलावर दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
महिन्याभरा पूर्वीच या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. महिन्याभरात या पुलावर छोटेमोठे असे २९ अपघात घडले. यातील ७ अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून, २२ अपघात किरकोळ होते. तसेच या अपघातांमध्ये एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहमद युसूफ (34) हा गोवंडी शिवाजी नगरातील बैंगन वाडी येथे पत्नी, मुलगा, आईवडील व भावासोबत राहत होता. त्याची पत्नी ८ महिन्याची गर्भवती असून युसूफ हा घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती.
कुर्ला सीएसटी रोड येथे त्याचा भंगारचा व्यवसाय असून, सोमवारी तो दुपारी ३ वाजता दुचाकीवरून घरी जात होता. दुचाकी त्याचा मित्र चालवत होता व युसूफ हा मागे बसला होता. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरील नवीन उड्डाणपुलावरून बैंगणवाडीकडे जात असताना पावसामुळे पुलावरील डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. यात युसूफ आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणण्यात नेले मात्र डॉक्टरांनी युसूफला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी पुलावरील रस्त्याची पाहणी करून दुर्घटना टाळण्यासाठी रस्ता खडबडीत करण्याचे काम हाती घेतले. तसेच या ठिकाणी पोलीसही तैनात केले.