मुंबई :
अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे पाय गमवाव्या लागलेल्या नागरिकांना टीम (T.E.A.M) या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील सुरू झालेल्या स्वयंसेवी संस्थेने नुकतेच केईएम रुग्णालयात ११ विद्यार्थ्यांसह १५० नागरिकांना ‘गिफ्ट अ फूट’ उपक्रमांतर्गत आयकॉनिक कृत्रिम अवयव दान केले. यामुळे या नागरिकांच्या आयुष्यात एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतील दारिद्र्यरेषेखालील विकलांग नागरिकांना जयपूर फूट मिळावे यासाठी T.E.AM ने भगवान महावीर विकलांग सहाय्य समिती (अपंगांसाठी जगातील सर्वात मोठी संस्था) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. याअंतर्गत नुकतेच १५० नागरिकांना परळ येथील KEM हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात त्यांना जयपूर फूट बसवण्यात आले.
केईएम रुग्णालयात १५० हून अधिक लोक जमले होते, जेथे ते अपंग पायाने आत गेले आणि कृत्रिम पाय घेऊन आनंदाने आणि चांगल्या भविष्याच्या आशेने बाहेर पडले. या देणगी मोहिमेअंतर्गत या लोकांसाठी राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था देखील केली होती. कृत्रिम अंगाने, एखादी व्यक्ती १० तासांपेक्षा जास्त काळ आरामात आपली कामे करू शकते.