मुंबई :
नाताळ हा लहानग्यांचा आवडता सण… हा सण जवळ आला की जिंगल बेल , जिंगल बेल , जिंगल ऑल द वे .. जगभरात चिमुकळ्यांच्या ओठांवर येऊ लागत. आता नाताळ आला की, सांताबाबा काय देणार याची उत्सुकता लहानग्यांना लागते. यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर सांताक्लॉजने चॉकलेटऐवजी मास्क, सॅनिटायझरची भेट लहानग्यांना दिली.
सध्या जगावर कोरोना आणि ओमायक्रॉनची दहशत पसरली आहे. या महामारीपासून बचावासाठी लसीकरण हा एकच पर्याय सुरू आहे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखण्यासाठी शासनाकडून सर्वच स्तरावर सूचना केल्या जात आहेत.
देशात लसीकरणाचे शंभर कोटी डोस पूर्ण झाल्यानंतर शासनाने निर्बंध घालत ऑनलाईन सुरू असलेल्या शाळा टप्याटप्यात प्रत्यक्ष सुरू केल्या.
साकिनाका येथील प्रगती एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ट्युलिप इंग्लिश स्कुलचे संचालक राजेश सुभेदार, ज्योती सुभेदार यांच्या वतीने कार्याध्यक्ष सलोनी कुडाळकर यांच्या संकल्पनेतून मुलांसाठी सांताक्लॉज भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लाल रंगाचा पोशाख , सफेद दाढी, काळे शूज घालून पेहराव करणाऱ्या सांताक्लॉजने आपल्या पोतडीतुन मुलांच्या बचावासाठी मास्क व सॅनिटायझरची भेट दिली. महामारीत आपला बचाव करण्यासाठी सांताक्लॉजने मुलांना सुरक्षेची काळजी म्हणून मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी शाळेत सांताक्लॉज सोबत धमाल केली.